१६-५-२०१२
लिहीत
असतो मी कविता, कथा, दीर्घकथा
शब्द असंख्य
बोलत
असतो वाचाळ गप्पा, भाषणं, संभाषणं
वेळी अवेळी
निरर्थक
शब्दांचं एक सगळं जग
पोकळ अर्थहीन
अन त्या
पोकळीतून येतो अचानक
शब्द एक
काहीतरी, कुठूनतरी, कसातरी
एकच शब्द
सूर्याच्या
तप्त कल्लोळातून जन्मलेला
शब्द लख्ख
काळ्यानिळ्या
मृतवत पडलेल्या अंधारात
शिरतो
सर्र्कन्
पोचून गाभ्यात
उजळवून टाकतो
अंधाराच्या
गर्भाला
मिळून एकजीव
होतो तेजस्वी अंधाराशी
शब्द
सूर्यपूत्र.
शोधत बसतो मी
मात्र माझा एकुलता
अर्थवान शब्द
प्रगाढ अंधारही शोधतो स्वतःच्या उदरात
(प्रगाढ= great, vast, profound)
माझा शब्द
कृष्णविवरात
शिरलेल्या तेजाला कधीही
सुटका नसते
तरीही धरतो मी
आशा अशक्य शक्यतेची
तेजगर्भित
शब्दासाठी
कृष्णविवराच्या
कृष्णमिठीतून सुटेल तो
तमोकिरण होऊन
घेईल छेद
स्वर्गीय ओजस्वी लक्ष्याचा
पितासूर्याच्या
हृदयगर्भाचा
पितृहृदयाचे
मात्रोदर करून तिथे
रुजवेल बीज
पुनःश्च एकदा
प्रकटण्यासाठी
नवा शब्द