Friday, May 1, 2015

Naina नैना


माझ्या बिल्डींगच्या मागे एक टेकडी अाहे, बोडकी. तिच्या बोडक्या माळरानावर एकंच हिरवं बेट अाहे, भटजीच्या टकलावरच्या शेंडीसारखं. दाट, हिरवंकंच! टेकडीवर सकाळ संध्यकाळ फिरायला येणारी माणसं सर्वत्र बिया फेकत असतात, पण टेकडीचा माळ कशालाही दाद लागू देत नाही. या हिरव्या बेटाच्या जागी मात्र त्याची अभेद्यता भंगली अाहे, कृष्णाच्या अंगठ्यासारखी. अाणि त्या इवल्याशा जागेत हिरवाईने गच्च दाटी केली अाहे. त-हत-हेची झाडं दाटीवाटीने तिथे उभी अाहेत. अहमहमिकेने वाढली असली तरी एकमेकांना सांभाळून घेत. त्यांच्या अगदी मध्यभागी उभा अाहे एक पिंपळ - स्थिर, शांत, गंभीर. सभोवतालच्या हिरव्या दाटीतून वा-याची एखादी लहरसुद्धा त्याच्यापर्यंत पोहोचू शकली नसती, पण हिरवाईने समजूतदारपणे एक चिंचोळा मार्ग मोकळा ठेवला अाहे, हिमालयाकडून येणा-या उत्तरवा-यासाठी. तो येतो तेव्हाच काय ती होते पिंपळाची गूढ सळसळ, बाकी सारावेळ केवळ नि:स्तब्ध शांतता, अाणि अंधारा गारवा. बाहेर मध्यान्हीचा चैत्रवणवा पेटला असला तरी या पिंपळापाशी असतो थंड काळोख. अशा या जागेत कोणा भक्ताने तशाच कृष्णशीतल पाषाणात नागदेवतेचं शिल्प उभं केलं अाहे. एकावर एक काळ्या वेटोळ्यांवर रोवून उभा केला अाहे स्थिरगंभीर फणा. अविचल तरीही निमीषार्धात दंश करू शकेल याची खात्री वाटावी असा. त्या पाषाणाप्रमाणेच त्यातल्या नागदेवतेचे डोळेही निष्प्राण भासतात, पण तरीही त्यांच्यात प्रचंड उर्जा दाटलेली जाणवते. नागदेवतेच्या तोंडातून अतिशय कौशल्याने तिची जिव्हा कोरलेली अाहे. तिही स्थिर असली तरी जाणवत राहते की कणभरही हालचाल न करता तिला सर्व जाणिवा होत अाहेत - या जगातल्या अाणि त्या पलिकडच्याही. येणारे जाणारे भक्त त्या जिव्हेला शेंदूर लावतात अाणि वेटोळ्यांवर डोकं टेकवून नागदेवतेची याचना करतात - निसर्गाच्या अगम्य विराट लीलांपासून अामचं रक्षण कर अाणि त्यांच्यात विलीन होण्याचे सामर्थ्य अाम्हाला दे. काळोख्या जागेतल्या काजळी वातावारणातला काळाकभिन्न नाग, त्याची लालचुटूक जिव्हा, अाणि तिची दैवी जाणीव! 

अशीच एक एप्रिलची संध्याकाळ. सूर्य अस्ताला गेला होता, पण दिवसभर होरपळलेल्या माळाला अाता चंद्रकिरणांचे चटकेसुद्धा असह्य झाले असते. ते जाणचूनच की काय चंद्राने अाज सुट्टी घेतली होती. सूर्य निजायला गेला होता पण असंख्य निशादीप अजून जागे व्हायचे होते. अशा उजेड नि अंधार यांच्या मधल्या काळात पिंपळाखालची गूढता अाणखीनच गडद होते. अंधार होत होत त्यात नागदेवताही विरघळून गेल्यावर बराच वेळ ती शेंदरी जीभ तेवत राहते, निरंजनाच्या वातीसारखी. तिही दिसेनाशी होईपर्यंत तिथे बसून रहायचं नी मगच घरी परतायचं असं मी अनेकदा करतो. अाजही त्याच इराद्याने मी माळावर हिरव्या बनाच्या दिशेने रमतगमत चाललो होतो. इतक्यात एक स्त्री पलिकडून झपकन बनात शिरताना दिसली. यावेळी कोण कशाला तिथे यईल?! खरंच कोणी गेली की मला भास झाला? पण भास नसावा कारण ती कोण अाहे हे मी अोळखलं होतं. चेहरा  दिसला नसला तरी ते शरीर मी अोळखलं होतं. कोणत्याही वेषात तिला मी अोळखू शकतो. ती नैनाच होती.

नैना! पाच-सात वर्षांपूर्वी नयनशी लग्न करून ती अामच्या भागात रहायला अाली होती. नयन अाणि नैना. अतिशय सुस्वरूप जोडपं, उल्हास अाणि तारुण्याने सळसळणारं. नैनाने अापल्या वागण्याने अल्पावधीतंच घरच्यांची अाणि परिसरातल्या सगळ्यांची मनं जिंकली होती. पुरुषांच्या तर ती खास लक्षात राही. तिचा सशक्त सुडौल बांधा, हसरा चेहरा अाणि सर्वांवर मात कारतील असे ते तिचे डोळे! तिचे डोळे जणू दैवी होते. लखलखणारं तेज होतं त्यांच्यात. स्मितहास्य करून ती एक कटाक्ष टाकून गेली तरी पुढचा कित्येक काळ अापले डोळे त्या डोळ्यांनी भरलेले भारलेले रहायचे.

दृष्ट लागावी असं जोडपं. अाणी लागलीच जणू त्यांना दृष्ट. हळूहळू नैनाच्या चेह-यावरचं हसू मावळायला लागलं, डोळ्यातलं तेज लोप पावू लागलं. काय झालं कळेना, कोणीच काही बोलेना. तिचं तोंड तर अाता जणू शिवून टाकल्यासारखं बंद झालं होतं. बायका काही बाही बोलायच्या, तिच्या नव-याबद्दल, कसं “तीच म्हणून सहन करू शकते” वगैरे. नैनाच्या व्यक्तिमत्वातली रसरस नाहीशी झाली होती. बरेच दिवस हे असंच चाललं होतं नी एक दिवस हल्लकल्लोळ माजला. बातमी अाली की नैनाने टेकडीवर नव-याच्या डोक्यात दगड घालून त्याचा कपाळमोक्ष केला. मोठ्याने भोंगा वाजवीत पोलिसांची गाडी त्यांच्या दारात हजर झाली. नैनाला ताब्यात घेऊन त्यात घालून निघून गेली. तिला घेऊन जातान प्रत्यक्ष पाहणा-यांनी सांगितलं की त्या वेळी तिच्या चेह-यावर कोणतेही भाव नव्हते. जणू स्वतःच दगड होऊन, कार्यभाग साधून गारढोण पाषाण झाला होता तिचा. 

कालांतराने ती जामिनावर बाहेर अाली, अामदार मामाच्या मार्गदर्शनाखाली निर्दोष सुटली अाणि पुन्हा घरी येऊन राहू लागली. सासरच्यांनी तिला सामावून तर घेतलंच पण तिच्याभोवती सुरक्षेचं कवच तयार केलं. मला ती एक प्रकारची नजरकैदच वाटायची. पण नैनाला त्यातून बाहेर यायची बिल्कूल इच्छा दिसत नव्हती. एखादी निष्प्राण वस्तू इकडून तिकडे हलावी तसा तिचा वावर होता. माणूसपणाची स्त्रित्वाची कुठलीही जाण तिच्यात जाणवेनाशी झाली होती. पण या मानवी भावभावनांचं, अाघात-अनाघातांचं निसर्गाला काय। तिचा डौल नष्ट झाला होता तरी तिची सुबकता तशीच होती, अाणि वस्तीतल्या परुषांचं त्या पुतळ्यावरचं लक्षही अबाधित होतं.

मला नैना दिसली हे नक्की, पण तो माझाच भ्रम होता की ती खरोखर तिथे बनात शिरली? माझी पावलं कुतूहलाने झाडांमध्ये शिरली. उत्तरवारा सुटला होता, पानांची संतत सळसळ चालू होती. या अावाजात माझी तिला चाहूल लागण्याची शक्यता कमी होती. तसंच ती कुठे अाहे हे मला सहज जाणवणार नव्हतं. अचानक ती समोर येण्याची शक्यता अधिक. का कुणास ठाऊक पण मला नयन अाणि त्याच्या डोक्यातला दगड ते प्रकरण अाठवलं. मी सावधान झालो, अधिक जपून पावलं टाकू लागलो. हळूहळू मी पिंपळापाशी पोहोचलो. माझ्या मनातील संदेह, सभोवतालचा अर्धवट अंधार यांनी पिंपळाची गूढता दाटून अाली. तेव्हढ्यात मला कुठूनसा स्त्रिचा अावाज अाल्यासारखं वाटलं. मी दचकून स्तब्ध झालो नि कान एकवटून ऐकू लागलो. पुन्हा अावाज अाला. स्त्रिच्या कण्हण्याचा अावाज होता तो. नैनाला काही धोका तर नाही अाणि असला तर मला मदत करावी लागेल अशी मी मनाची तयारी करू लागलो. पुन्हा अाला अावाज, स्त्रिच्या कण्हण्याचाच. पिंपळामागून. मी कान रोखले. अजून एकदा अाला तो अावाज, पुन्हा पुन्हा येत राहीला. माझ्या लक्षात अालं की तो अावाज कण्हण्यासारखा असला तरी कण्हण्याचा नव्हता. त्याच्यात उत्कटतता होती, अार्तता होती. कदाचित लयही होती. तीव्रता होती अाणी ती वाढत चालली होती. पानांची सळसळ, रातकिड्यांची किर्रर्रर् यांनी अासमंत भरून गेला होता अाणि त्या पार्श्वभूमीवरही तो स्त्रैण अावाज उठून जाणवत होता. अावाजात अाता उन्माद अाला होता. जे चाललं होतं ते अतर्क्य होतं. कानांनी त्याची अनुभूती घेत असताना माझं लश नागदेवतेकडे गेलं. समोरचं दृश्य पाहून माझे डोळे विस्फारले. नागदेवतेची ती शेंदरी जिव्हा लवलवत होती. काळोखातल्या काळ्या पाषाणातली ती जिव्हा जिवंत झाली होती, तेजस्वी झाली होती, विद्द्युल्लतेसारखी लवलवत होती. पिंपळामागे सुरू असलेल्या स्त्रिशक्तिच्या सजीच अवताराच्या दैवी ताकदीने निर्जीव देवमूर्तीत जीव भरला होता. पिंपळामागच्या उत्कटतेबरोबरंच नागदेवतेच्या जिव्हेची हालचाल अाणि तिचं तेज वाढत चाललं होतं. शेंदरी प्रकाश पिंपळावर पडला होता. पिंपळामागच्या अावाजाचं ते दृश्य स्वरूप होतं. पिंपळामागचा अावाज वाढत गेला, जणू किंकाळ्या वाटावा असा. त्याचवेळी नागदेवतेच्या जिव्हेची लवलव वाढत ती इतकी तेजस्वी झाली की रक्तीम प्रकाशाने संपूर्ण पिंपळ उजळून निघाला.

क्षणभरंच. मग अंधाराने सगळं सामावून घेतलं. संपूर्ण . प्रकाश नाही, अावाज नाही. पण स्त्रैण गंध बनात पसरला होता. त्यात माझे अश्रू मिसळले. असा किती वेळ गेला माहीत नाही. भानावर अालो तेव्हा उत्तरवारा मला गदगदा हलवून जागं करत होता, साथीला पर्णसंगीत चालू होतं.

दुस-या दिवशी नैना मला दिसली. नेहमीसारखीच निष्प्राण गारढोण. संध्याकाळी बनात नागदेवता नि जिव्हा - त्याही तशाच निश्चल.

  • नरेन् 

(नरेंद्र दामले)
(Narendra Damle)

No comments:

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...