आपलं मन
काळ्या कुट्ट
गच्च घट्ट
नक्षीदार पेटीत
कुलपबंद करून
ती किल्ली
क्षितीजापार फेकून
राजा लढाईला निघाला
खरंतर त्याला
राणिचा जीव
न्यायचा होता
खांद्यास खांदा
तसा असावा
जीवास जीव
राणीने दिला
स्पष्ट नकार,
"काहीबाही
बरंवाईट झाल्यास
प्रजेला असेल
माझी गरज"
राजा चमकला
चिंतीत झाला
विचार केला
ठेवावा मागे
डोळा इथेच,
……
सोबतही होईल
डोळा एकटा
फक्त पाहणार
कळणार काहीच नाही
म्हणून मदतीला
ठेवावं मन
कुलुपात सुरक्षित
एकाक्ष राजाचं
मन नसलेल्या लढाईत
जे व्हायचं तेच झालं.
मागे तिकडे
किल्ली शोधायला
कुणी गेलंच नाही
आजही पडून आहे
ती किल्ली
माझ्या पायाशी
::::::::::::::::::::::::
राजाचं
चुकलंच म्हणा
हक्क
गाजवायला हवा होता
राणीवा
जीव न्यायला हवा होता
तसंही
तिच काय बिघडणार होतं
स्त्रीशरीराला
ताकद असतेच की
अगदी
जिवाशिवायही
No comments:
Post a Comment