Saturday, April 25, 2020

कोंबडी आधी की अंडं आधी

काल मावळलेला सूर्य सकाळी उगवलायसंध्याकाळी पुन्हा मावळणार आहे नव्याने उगवायला. सूर्यदर्शन घेऊन मी छाती भरून घेतलीय ती मी रिकामी करणार आहे पुन्हा भरून घ्यायला. संध्याकाळ-सकाळ-संध्याकाळ सतत चालू. काय आधी नी काय नंतर, काय नंतर नी आधी  कायउन्हाळा-पावसाळा-हिवाळा-उन्हाळा ऋतुचक्र सतत चालूदिवस रोज़ उगवतो पणहर शाम की सुबह नई’. तेच ते तेच ते ,तरीपण नवीन ते. सुरुवात होते, नी संपते तीही सरुवातीच्या जागी येऊनंच. प्रत्येक शेवट हा नव्या सुरुवातीचा गर्भ असतो, प्रत्येक सुरुवात ही एका शेवटाची दवंडी असते. खरंतर आरंभ आणि शेवट हे आपण आपल्या समजूतीसाठी वापरलेले शब्द. नाहीतर कसली सुरुवात नी कसला शेवट. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, पृथ्वी सूर्याभोवती, तसंच इतर ग्रहांचं आणि त्यांच्या चंद्रांचं, मग ही आपली सूर्यमाला मोठ्या सूर्याभोवती फिरतेअशा अनेक सूर्यमाला आकाशगंगेभोवती, एक आकाशगंगा दुस-या आकाशगंगेभोवती, अशा अनेक आकाशगंगा तिस-या आकाशगंगेभोवती, काही एकमेकांभोवती. पण फिरणं सतत चालू. कोणीही स्थिर नाही, काहीही स्थिर नाही. वर गेलंय ते खाली येणार, खाली आलंय ते वर जाणार. जवळ आहे ते लांब जाऊन जवळ येणार, लांब आहे ते जवळ येऊन लांब जाणार, मग पुन्हा सुरू. समुद्रातलं बाष्प वर गेलं, त्याचे ढग बनले, ढग पाऊस बनून जमिनीवर खाली आले, नद्यानाल्यांतून ते पाणी समुद्राला मिळाले पुन्हा ढग बनण्यासाठी.

आपल्या आयुष्यातही हेच, सतत. श्वास-उच्छ्वास-श्वास-उच्छ्वास, उठणे-झोपणे-उठणे-झोपणे सतत चालू. उठतो रोजच आपण, पण रोज उठल्यावर आपल्याला वेगळं वाटतं. कालच्यासारखं आज नसतं आजच्यासारखं कधीच नव्हतं, कधीच नसेल. नैसर्गिक क्रियाप्रक्रियांमध्ये आपण अशी अनंत चक्र अनुभवत असतो. तेच आपण आपल्या आवडीनिवडीत, आपल्या वर्तणुकीतही साहजिकपणे सामावून घेतलं आहे. अगदी आपल्या रंगसंगती, फॅशन सगळीकडे बदल करत करत परत पहिल्या जागी.  आपली कोळीनृत्य पहा. समुद्रच्या लाटांसारखं आलेआलेआले नि गेलेगेलेगेले. आपली आदिवासी नृत्य पहा किंवा लोकनृत्य पहा. संगीतात, गाण्यांत, पदन्यासात असेच पुनरावृत्तीचे अनुभव येत राहतात. भारतीय संगीतात शास्त्रीय पद्धतीने याची आवर्तानांत बांधणी केली आहे. गायन असो वा वादन असो, तालाप्रमाणे कुठेही फिरून कलाकार समेवर येतोच, नी तिथून पुन्हा उठतो. १० मात्रा, ११ मात्रा, १४-१६ मात्रा असतील, ताल कुठलाही असो, राग कुठलाही असो पण समेवर येणं काही चुकणार नाही. त्यात कंटाळवाणा तेचतेचपणा नसतो. प्रत्येक आवर्तन वेगळं , प्रत्येक आवर्तनाचं नाविन्य वेगळं, प्रत्येक आवर्तनातलं सर्जन वेगळं, सृष्टीचं व्यक्त होणंच जणू.

भारतीय परंपरेत, धार्मिक विचारांत विश्वाच्या चक्रागार गतीचा फ़ार खोलवर विचार केला आहें. आपल्या अनुभावांच्याच नाही तर आपल्या अनुभवक्षमतेच्याही मर्यादा जाणल्या आहेत आणि त्याच्या पलिकडे असलेली विश्वाची अगाधता जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे. समजापलिकडच्या गोष्टी उमगून घ्यायचा प्रयत्न केला आहे. अनेकदा आपले अनुभव एकदिशी असतात. काळ पुन्हा येत नाही, येऊ शकत नाही असे आपले अनुभव सांगतात. जन्म घेतल्यावर बालपण, तरुणपण, वार्धक्य नि शवटी मरून संपून जायचं असे आपले अनुभव आहेत. पण विश्वात काही निर्माण होत नाही नि काही नष्टही होत नाही. सृष्टीत जे आहे ते आहे. संपूर्ण सृष्टीचा आत्मा समान आहे, एक आहे. त्यामुळे जन्म म्हणजे आरंभ आणि मृत्यू म्हणजे अंत असं असू शकत नाही.  जन्म-मृत्यू-जन्म-मृत्यू अशा अथक अनंत आवर्तनांतला जन्म ते मृत्यू एव्हढाच भाग आपल्या पार्थिव अनुभवांना जाणवतो. म्हणून मग पुढच्या जन्मला पुनर्जन्म असं नाव दिलं. वैश्विक पातळीवर जसा पुनर्जन्म तसाच पुनर्मृत्यू, दोन्ही एकच. 


सृष्टी अशी आवर्तनांनी बनलेलेी आहें कारण विश्वच मूळी एक आवर्तन आहें. आपल्या समजूतीसाठी त्या आवर्तनांचे भाग करून त्यांना नावं दिली आहेत.  सत्यतुग, त्रेतायुग, द्वपारयुग, कलियुग नि पुन्हा सत्ययुग असा काल फिरत असतो. काल आणि कालौघाने त्याबरोबर फिरणारे विश्व अनादी अनंत आहेत. अनेक शहरांत पर्यटनासाठी चक्राकार फिरणारी हॉप-ऑन-हॉप-ऑफ बस असते ना, आपण पाहिजे तेव्हा पाहिजे तिथे चढतो नि पाहिजे तेव्हा पाहिजे तिथे उतरतो. तोच आपला प्रवास, तोच आपला विश्वाचा अनुभव. बस मात्र चालूच असते, अव्याहत. तिचा प्रवास संतत आवर्तानांचा, ना सुरुवात ना शेवट.

कळलं ना, कोंबडी आधी की अंडं आधी ते ? !

No comments:

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...