Wednesday, October 13, 2010

तो आक्रोश माझा होता

सभोवतालच्या दूर डोंगरांतल्या
सन्यस्त खड्‍गांतून जो
निरव खडखडाट रवत होता
अगाध गुहांच्या तमातून
निःस्तब्ध योग्यांच्या मनातून
निःशब्ध जो ओंकारत होता
तो माझा आक्रोश होता

विजेच्या कल्लोळात घनघोर वादळात
वरून प्रपातात चहूकडून प्रवाहात
सजीव स्फुल्लिंगी अंगागात
निर्जीव पाषाणी अंतरंगात
अजगराला वेटाळून जो
मृतवत तमोगत झोपला होता
तो माझा आक्रोश होता

उदरातच भ्रूणकळी खुडली होती
पाहण्याआधीच स्वप्ने संपली होती
वेळेआधीच निर्भावी स्खलन झाले होते
पत्थरी पाझर सारे सुकले होते
अंकूर मनाचा बर्फ़ाने थिजला होता
आर्त मूक तयांचा हुंदका जो होता
तो माझा आक्रोश होता

अश्वत्थाची जखम जेव्हा भरली
त्या अनादी अनंत काळामधून
लटकत्या त्रिशंकूला स्थैर्य मिळाले
त्या अमीती निराकार पोकळीमधून
व्यासाच्या प्रतिभेला उत्प्रात लाभला
तशा निर्गुण नोर्मोही प्रपातातून
जो टाहो उत्स्फुरत होता
तो आक्रोश माझा होता

No comments:

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...