काहीशी दमट काहीशी कोंदट
काहीसा उजेड जरासा अंधार
मधूनच वाऱ्याची हलकी झुळूक
हवेत उभरलेली नवथर थरथर
एकदमशी थोडी उघडीप मोकळीक
कुठूनशी तिरकी कोवळी किरणे
बहुतेक सूर्याची, जराशी चंद्राची
लांबून येणारी आर्त सुरावट
बाहेरून येणा्री वा मनातच उभरणारी
कोणा तरुणीची वा लहानगीची
माझ्या प्रियेची वा गोडुलीची
मनात उठलेले काहूर तरंग
सुरास सूर मिळल्यासारखे
मनातून सूर उमटलेले
स्वरविश्व जन्मल्यासारखे
फ़ुलताना एक थोडेसे फ़ूल
काळे पिवळे निळे सावळे
यावर एक पाखरू फ़ुलपाखरू
सावळे पिवळे निळे काळे
कसे रंग रंगांत मिसळलेले
आकार इतस्तः विखूरलेले
स्वप्नगंध दरवळल्यासारखे
रंगस्वप्न उमटल्यासारखे
धूसर अशा या धुक्यात
दिसतंय ते खरं की नाही
नक्की काय वाटतंय जर
समोर काहीच नक्की नाही
धुकंच आहे की दुसरं काही
मी तरी आहे की तोही नाही
रहावं असच हरवल्यासारखं
आहे नाही मिसळल्यासारखं.
No comments:
Post a Comment